नाशिक – पारनेर (जि.नगर) येथील तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी केलेल्या बेकायदेशीर कामांची त्वरित चौकशी करून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी आज मंगळवार पासून आपण नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्याची माहिती कर्जुले हर्या येथील रहिवासी आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
कर्जुले हर्या येथील गट नंबर ६७ मधील अनधिकृतपणे संमत केलेला बिनशेती आदेश पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याबाबत पारनेरच्या तहसीलदारांवर कार्यवाही व्हावी तसेच अधिकार नसतांही पारनेर तालुक्यातील तेरा गावात बेकायदा व अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन पारित केलेल्या सर्व बिनशेती आदेशांची चौकशी करून त्याबाबत पारनेरच्या तहसीलदारांवर कार्यवाही व्हावी तसेच अधिकार नसतांही पारनेर तालुक्यातील तेरा गावात बेकायदा व अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन पारित केलेल्या सर्व बिनशेती आदेशांची चौकशी करून त्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
पूर्णवाद कोविड सेंटरच्या माध्यमातून खासगी डॉ.श्रीकांत पठारे यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी चालविलेल्या कोविड सेंटरची चौकशी करून सामान्यांची केलेली लूट तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी. विधानसभा निवडणूक २०१९ मधील निवडणूक खर्चाचा तपशील सार्वजनिक करून नियमबाह्य खर्चाची चौकशी करावी व हा संपूर्ण खर्च वसूल करावा. तसेच नगर व पारनेरमध्ये सुविधा असतानाही जळगाव अमळनेरचे एजंट का नेमले याचीही चौकशी सखोल चौकशी व्हावी. पारनेर तालुक्यातील गौण खनिज व स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून हप्ता स्वरूपात येणाऱ्या पैशांची चौकशी करावी व या माध्यमातून बुडालेला महसूल त्यांच्याकडून वसूल करावा तसेच ज्योती देवरे यांनी शासकीय गाडीवर बेकायदेशीररित्या ठेवलेल्या खाजगी ड्रायव्हरची चौकशी करून त्याचे कॉल रेकॉर्डिंग तपासावे व व्हाट्सएपच्या संदेशाची चौकशी करावी,अवैध वाळू उत्खनन तपास व्हावा असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
आपल्या मागण्यांसाठी या आधी १३ जुलैला अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण केले होते. मात्र त्यावेळी श्रीगोंदा-पारनेरच्या उप विभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आपण उपोषण मागे घेतले होते. परंतु नंतर आपण ज्यांच्यावर आरोप केले त्याच्या चौकशीसाठी त्याच अधिकाऱ्याला नेमण्याचा धक्कादायक प्रकार तर हास्यास्पदच होता. त्यामुळेच आता ज्योती देवरे यांच्या बेकायदेशीर कामाच्या चौकशीसाठी व त्यांना निलंबित करावे त्या मागणीसाठी आपणास नाईलाजास्तव विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागत आहे, असेही आंधळे पाटील यांनी निवेदनात शेवटी स्पष्ट केले आहे.