नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल कर्मचाऱ्यांचा 14 मार्च, 2023 पासून बेमुदत संप आंदोलन निवेदन प्राप्त झाले आहे. परंतु संप काळात कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने कार्यालयास व अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांनी संप काळात सहकार्य करून नियमांचे पालन करावे , असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. तसेच संप मागे घेण्याचे आवाहनही केले आहे.
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचा-यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व कर्मचारी यांच्या व्यक्तीशः निदर्शनास आणावेत. तसेच त्या आदेशाची प्रत शासनाच्या प्रत्येक विभाग, कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्यात यावी, अशा सूचना श्री. गमे यांनी विभागातील पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिका आयुक्त व सर्व शाखाप्रमुखांना केल्या.
संप काळात संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांचेकडे दयावी. आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, असे गमे यांनी सांगितले.
शासकीय कर्मचा-यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने कर्मचा-यांना अवगत करण्यात यावे, असेही श्री. गमे सांगितले. शासनाच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत अशा सेवांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे, जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्याविरुध्द सदर अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
Divisional Commissioner on Government Employee Strike