नंदुरबार – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला निनावी सुचनेनूसार अल्पवयीन मुलीचा विवाह नवापूर तालुक्यातील नावली पो.मोग्राणी येथे 30 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यावर त्वरीत कार्यवाही करुन अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.
प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले.
पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’ तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. यावेळी बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य रेणूका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, जन साहस संस्थेच्या समुपदेशिका अनिता गावीत, खांडबारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे, हे.कॉ.विश्वास गावीत,अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांनी सहकार्य केले.