रायपूर (छत्तीसगड) – सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या देशभर चर्चेचा ठरत आहे. जिल्हाधिकारी एका युवकाच्या कानशिलात लगावत असल्याचा तो व्हिडिओ आहे. सरकारी अधिकाऱ्याने भररस्त्यात तरुणाला अशाप्रकारे मारणे योग्य नसल्याचा सूर सोशल मिडियात आळवला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. तसेच, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केली आहे.
मास्क घातलेला नसल्याने सूरपूरमध्ये कारवाई सुरू होती. त्याचवेळी एका रस्त्यावर कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला रोखले. यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना तो तरुण मोबाईल फोनवर काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल फोन जमिनीवर फेकला. तसेच या युवकाच्या कानशिलात लगावली. यानंतर घटनास्थळी असलेले पोलिस व अधिकारी तेथे पोहोचले आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या युवकाला मारहाण केली. त्यानंतर सोशल मीडियावरील व्हिडिओ खूप व्हायरल झाला.
व्हिडिओनुसार असे म्हटले जाते की, सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी त्या युवकाला मारहाण करण्याचे आदेश दिले असे सांगण्यात येते, मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि सांगितले की, लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे की, आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला मी चापट मारत असल्याचे दिसून आले. आजच्या वर्तनाबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो . त्या व्यक्तीचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. परंतु तो तरुण पोलीसांनी सांगूनही मास्क न घालताच मोटरसायकल वरून वेगाने जात होता आणि त्यानेही गैरवर्तन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्या तरुणाला आणि त्याच्या आईलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्याने नमूद केले आहे. परंतु तो तरूण म्हणाला की, तो आता बरा झाला आहे, पण आईला अद्यापही संसर्ग आहे. त्याच्या आईवर घरी उपचार सुरू असल्याचेही त्याने सांगितले. त्यांनी घरीच राहावे, असे मी त्याला सांगितले, पण त्याचा गैरसमज झाला आहे. तसेच सर्व कोविड रुग्णांनी घरीच राहावे, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना प्रशासनाने केले आहे.
https://twitter.com/Abhinav_Pan/status/1396146300492468226