नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील इंदिरा नगरचे सेवानिवृत्त आभियंता अशोक धर्माधिकारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून रघुनंदन मित्र मंडळ ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून ते दरवर्षी दिवाळीला त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी भगिनींना नवीन साड्या व ब्लॉऊझ पीस तसेच दिवाळीचा फराळ देऊन त्यांचे समवेत दिवाळी साजरी करतात. यावर्षी खरोली, बांगरवाडी, गोहिरेवाडी, मास्तर वाडी, लक्ष्मणपाडा आणि जावईपाडा या आदिवासी पाड्यावर पाचशेहून अधिक नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले. अशोक धर्माधिकारी व कुमद धर्माधिकारी यांनी नवीन साड्यांचे संकलन केले. यासाठी मुकुंद दीक्षित, वासंती दिक्षित, रविंद्र कुलकर्णी, कुंदा कुलकर्णी, विनायक सातपुरकर यांचे मोलाचं सहकार्य लाभले. आदिवासी भगीनींच्या चेहर्यावर आनंदाची अनुभती अनुभवली. खूप समाधानात कार्यक्रम संपन्न झाला. असे मनोगत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. उपक्रमात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करुन तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच या संघातर्फे दरवर्षी गरजु व आदिवासी विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल, विषयानुरुप एकरेघी, दुरेघी, चौकट अशा विविध प्रकारच्या वह्या वाटप करतात. सोबत शिसपेन्सील, खोडरबर, संपूर्ण कंपास पेटी तसेच पहिली व दुसरीच्या मुलांना स्वच्छतेसाठी हातरुमाल, नखं काढण्यासाठी नेलकटर, हात सफाई साठी साबण, शाळेसाठी प्रथमोपचार कीट देखील देतात.