इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत वडिल सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. तर आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याअगोदर दिशा सालियनच्या वडिलांनी अशी कुठलीही शक्यता नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते. आता मात्र त्यांनी या प्रकरणात याचिका दाखल करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशा पद्धतीची मागणी या प्रकरणात करण्यात आली आहे. या याचिकेवर आता लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
या याचिकेत दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज केले. दिशाप्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली. त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल केला जावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असं याचिकेत म्हटलं आहे. मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा देखील याचिकेमध्ये दिशाच्या वडिलांनी केला आहे.
काय आहे प्रकरण
२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं. नंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप झाला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केला होता. त्यात सीबीआयने दिदिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्याचा आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट केले होते. पण, त्यानंतरही या प्रकरणात आरोप होत गेले. आता वडिलांनीच याचिका दाखल केली आहे.