अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या गिरणा धरणाचे १ व ६ नंबरचे गेट १ फुटा ने उघडण्यात आले, २१हजार ५०० दक्षलक्ष साठवण क्षमता असणारे हे धरण असून आज दुपारी १२ च्या दरम्यान अभियंता हेमंत पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात येऊन धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून २४७६ पाण्याचा विसर्ग आता गिरणा नदीत सुरू झाला असून धरणाच्या आवकेत होणाऱ्या वाढीवरून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले. गिरणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सातर्कतेचे आदेश देण्यात आले. गिरणा धरण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असले तरी ते जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. सलग ३-४ वर्षा पासून धरण भरून वाहत असल्याने सिंचना बरोबरच पाणी योजना त्यातून होत असल्याने त्याचा फायदा नांदगाव,मालेगाव शहर व तालुक्यातील अनेक गावांना होत असतो.