पुणे – ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं कर्करोगाच्या दीर्घ आजारानं आज पहाटे पुण्यात निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं होतं. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून मास्टर्स पदवी प्राप्त केली. आरंभ विविध सामाजिक संस्थांसाठी स्वयंसेविका, समाजशास्त्राच्या अध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केलं. समुदाय विकासासंबंधी त्यांनी काही संशोधनपर लेखही लिहीले. १९८५ मध्ये त्यांनी तयार केलेल्या बाई या पहिल्याच लघुपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्तम कथाबाह्य चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९८७ मध्ये पाणी या लघुपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
यानंतर मुक्ती, चाकोरी, लाहा आणि थ्री फेसेस ऑफ टूमॉरो असे इतरही लघुपट त्यांनी निर्माण केले. सुमित्रा भावे यांना चित्र रत्न पुरस्कार तसंच साहित्यिक योगदानासाठी कामधेनु पुरस्कारही मिळाला होता.