इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या विषयावर, सामाजिक मुद्यावर आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा हातखंडा आहे. घायल, घातक, दामिनी, अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करत संतोषी यांनी समाजातील मुद्दे अधोरेखित केले. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
गांधी हत्येनंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात असून गांधी आणि गोडसे आपापली वैचारिक भूमिका मांडताना या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत. यानिमित्ताने राजकुमार संतोषी सध्या बऱ्याच माध्यमांना मुलाखत देत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा चित्रपट बनवण्यामागची मानसिकता आणि उद्देश यावर भाष्य केलं आहे.
संतोषी म्हणाले, “माझ्या मनात हा चित्रपट करताना कसलीच भीती नव्हती. जर तुम्ही सत्य मांडत असाल तर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. गांधीजींवरही बरेच खोटे आरोप लावले गेले आणि गोडसेंच्या बाबतीतही अन्याय झाला. त्यांना हे सगळं करणं का भाग पडलं हे स्पष्ट करणारी भूमिका गोडसे यांनी मांडली होती. पण त्याचा आवाज दाबण्यात आला आणि लोकांनी त्याच्याबाबतीत एक ग्रह करून घेतला.”
गांधीजी आणि गोडसे या दोघांबद्दल लोकांना आणखी जाणून घ्यायला मदत होईल हाच या चित्रपटाचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संतोषी म्हणाले, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेलो नाही, माझा माझ्या कामावर विश्वास आहे आणि माझी विचारधाराही स्वतंत्र आहे.” राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने एकही बदल न सुचवता प्रमाणपत्र दिलं आहे. शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ पाठोपाठ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक या चित्रपटाला कसं स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Director Rajkumar Santoshi on Gandhi Godse Movie