इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘गंगाजल’, ‘अपहरण’, ‘डर्टी पॉलिटिक्स’ असे वेगळ्या प्रकारचे वादग्रस्त पण हिट चित्रपट देणारे निर्माता – दिग्दर्शक प्रकाश झा त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची मुलगी दिशा देखील त्यांना काही चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करत असते.
तुमच्यापैकी अनेकांना हे कदाचित माहीत नसेल की, दिशा ही प्रकाश झा यांची स्वतःची मुलगी नाही तर दत्तक मुलगी आहे. प्रकाश झा यांनी अभिनेत्री दीप्ती नवलशी लग्न केलं. १९८५ मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले, मात्र २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला मूल नाही. आठव्या महिन्यात दीप्ती नवल यांचं मिसकॅरेज झालं आणि त्यानंतरच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. शेवटी १७ वर्षांनी ते विभक्त झाले.
दिशा ही प्रकाश झा यांची स्वतःची लेक नाही. ती त्यांची दत्तक मुलगी आहे. प्रकाश यांना आधीपासून मुलगी दत्तक घ्यायची होती. त्यांनी आणि दीप्ती यांनी १९९१ मध्ये दिशाला दत्तक घेतलं. प्रकाश झा म्हणाले की, १९८८ मध्ये त्यांना दिल्लीतील अनाथाश्रमातून एक फोन आला. एक १० महिन्यांची मुलगी एका सिनेमा हॉलमध्ये सीटखाली सापडल्याची माहिती त्यांना फोनवर मिळाली. या मुलीला संसर्ग झाला होता आणि तिचे संपूर्ण शरीर उंदराने कुरतडलं होतं. याशिवाय तिला किडे चावले होते. प्रकाश झा यांनी तातडीने त्या मुलीला घरी आणून तिची काळजी घेतली. मुलगी काही दिवसातच तंदुरुस्त झाली, त्यानंतर प्रकाश झा यांनी सर्व प्रक्रिया पार पाडून तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव दिशा ठेवलं.
प्रकाश झा यांच्या आयुष्यात लेक आली, तर दुसरीकडे पत्नीशी घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी प्रकाश झा दिल्लीत आणि शूटिंगमुळे दीप्ती नवल मुंबईत होते. या परिस्थितीत प्रकाश झा यांनी स्वत: त्या मुलीला एक वर्ष वाढवलं. ते स्वत: तिला आंघोळ घालायचे, खाऊ घालायचे आणि कामावरही बरोबर न्यायचे. मुलगी एक वर्षाची झाल्यावर प्रकाश झा यांनी पाटण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पाटण्यात आल्यानंतर प्रकाश झा यांनी एनजीओची स्थापना केली. इथं प्रकाश झा यांनी मुलीला त्यांच्या आईबरोबर ठेवलं.
कालांतराने त्यांच्या आईचं निधन झालं. तेव्हा प्रकाश झा केवळ एनजीओचे काम पाहत होते. त्यामुळे त्यांनी दिशा सांभाळलं आणि काही वर्षांनी ते मुंबईला परतले. दिशाचं शिक्षण मुंबईतच झालं. त्यांची लेक आता मोठी झाली आहे. दिशाने काही चित्रपट निर्मितीमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं. ती चित्रपट निर्माती आहे. २०१९ मध्ये, दिशाने प्रकाश झा यांच्याबरोबर ‘फ्रॉड सैयां’ चित्रपटाची निर्मिती केली होती. दिशाचं ‘पान पेपर्स सीझर एंटरटेनमेंट’ नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
Director Prakash Jha Dipti Naval Adopted Daughter Story