मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भव्यदिव्य सेट उभारण्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जाला कंटाळून कर्जत येथील स्वत:च्या स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांच्यावर तब्बल २४९ कोटींचे कर्ज होते. त्यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओवर जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
लगान, जोधा अकबर आदी चित्रपटांसह प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा भव्य चित्ररथ साकारणारे नितीन चंद्रकांत देसाई यांचे कला क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांना या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी काही कारणास्तव सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा दोन वर्षांत या कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला १८० कोटींवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह २४९ कोटींच्या आसपास पोहोचली. त्यामुळे देसाई हे आर्थिक विवंचनेत होते. खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातील चर्चाही केली होती.
स्टुडिओतच घेतला अखेरचा श्वास
ज्या एनडी स्टुडिओतून कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एकापेक्षा एक सुरेख आणि भव्य प्रकल्प साकारले त्याच स्टुडिओत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. यानंतर कर्जत आणि खालापूर येथील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेचे सर्व पैलू तपासून पाहत असल्याचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.
director nitin desai nd studio bankruptcy loan
bollywood karjat art suicide