इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सैराट’ चित्रपटाने अनेक विक्रम तर केलेच पण त्याचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे नाव सर्वपरिचित झाले. ‘सैराट’पूर्वीही त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. ते देखील अत्यंत वेगळ्या विषयावरचे चित्रपट होते. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ हे त्याचे चित्रपट तुफान गाजले. या चारही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘नाळ’ हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. श्रीनिवास पोकळेने या चित्रपटात चैत्या, देविका दफ्तरदार यांनी त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा शेवट बघता या कथानकामध्ये पुढे काय होईल असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला होता. आता हे गुपित लवकरच उघडण्याची वेळ आली आहे.
नागराज मंजुळेने एक पोस्ट शेअर करत ‘नाळ’चा सिक्वेल अर्थात ‘नाळ २’ची घोषणा केली आहे. नागराजने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये सुधाकर, नागराज, देविका आणि श्रीनिवास दिसत आहेत. “मागच्या महिन्यात सुधाकरने फोन करून सांगितलं की ‘नाळ’चा दुसरा भाग लिहिला आहे. तो ऐकवायला कधी भेटू?, असा प्रश्न विचारल्याचं नागराज यांनी या फोटोवर म्हटलं. ‘नाळ’चा दुसरा भाग काय असू शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता होती. स्क्रिप्ट इतकी अनपेक्षित होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी झटक्यात शूटिंग सुरू केलं. पहिल्या ‘नाळ’ प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! ‘नाळ २’च्या नावानं चांगभलं!” अशी पोस्ट त्यांनी हा फोटो शेअर करताना केली आहे.
नागराजच्या या पोस्टमुळे नेटकरी खुश आहेत. या पोस्टवर अभिनंदनाच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट कधी येणार याकडे आता चाहत्यांचं लक्ष आहे. या सगळ्या पूर्वतयारीनंतर नुकतंच ‘नाळ 2’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. आता या कथानकात पुढे काय घडतं हे बघण्यासाठी प्रेक्षकांना आणखीन काही महिने वाट बघावी लागणार आहे.
https://www.facebook.com/1704772843/posts/pfbid02brwQprpTkQZBmARgqNvNjVoV5n4XqidfHoFPEEW9SMz4RH7fBXY1qezwdGLQK76Cl/
Director Nagraj Manjule Part 2 Movie Announcement