इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’ अशा चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन त्यावर लोकांना अपील होतील, असे चित्रपट बनवण्यात नागराज मंजुळे यांचा हातखंडा आहे. मराठी चित्रपटात अलीकडे अनेक वेगळे प्रयोग होताना दिसतात. तरीही मराठी चित्रपट फारच चालतायत असं दिसत नाही. यावरच नागराज यांनी भाष्य केलं आहे. मराठी सिनेमा इतर प्रादेशिक सिनमांप्रमाणे चालत का नाही, याबाबत नागराज बोलले आहेत. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या नागराज मंजुळे यांना मराठी सिनेमा न चालण्यामागे कोणती कारणं वाटतात, त्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीदेखील मोठी आहे. अनेक विषयांना हात घालणारे चित्रपट येथे तयार केले जातात. मात्र प्रेक्षकांचा ओढा तितकासा दिसत नाही अशी ओरड कायम असते. एका मुलाखतीत नागराज यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मराठी सिनेमा हा आशयपूर्ण असतो, पण तरीही चालत नाही. २०२२मध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले, अनेक तरुण दिग्दर्शकांनी उत्तम सिनेमे बनवले, कथा, कलाकार, सर्व गोष्टी चांगल्या होत्या, पण तरीही हे चित्रपट चालले नाहीत. याचं कारण काय, आपण कुठे कमी पडतोय, असं विचारलं असता नागराज म्हणाले, “मी फँड्री चित्रपट केला, तेव्हा मी असा चित्रपट करेन, असा विचारही केला नव्हता. आता ‘घर, बंदूक, बिरयानी’ करतानाही मी अशी भूमिका आणि चित्रपट करेन असं कधीच वाटलं नव्हतं. आपले चित्रपट आशयपूर्ण असतात, चांगले असतात, पण आपण सगळेच दाक्षिणात्य चित्रपट बघतो, तसेच मराठी लोकही दाक्षिणात्य चित्रपट बघतात. त्यांना जगभरातील सर्वच भाषांचे चित्रपट बघण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रेक्षक फक्त मराठीपुरते मर्यादित नाहीत,” असे नागराज सांगतात.
“दक्षिणेतील चित्रपटांमध्ये जसे वेगवेगळे प्रयोग केले जातात, तसे प्रयोग मराठीत करता येत नाहीत. प्रेक्षकांना काय आवडेल आणि काय नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे फार घाबरत हे प्रयोग करावे लागतात. मराठी माणसाचा स्वभाव वेगळा आहे. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना मराठी सिनेमे बघायचे असतात. ‘सैराट’ चित्रपट बनवताना मी खूप घाबरलो होतो, खूप हिंमत करून त्या चित्रपटाची निर्मिती केली होती. आताही ‘घर, बंदूक, बिरयानी’ हा चित्रपट करताना करताना तीच भीती वाटत होती,” असं नागराज मंजुळे यांनी सांगितलं. त्यांच्या या आगामी चित्रपटाची खास चर्चा आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
https://twitter.com/Nagrajmanjule/status/1586196159734743040?s=20&t=lcZGsChIEnDs69APTU1SVQ
Director Nagraj Manjule on Marathi Movie Performance Success