इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सारेगमप चॅम्प या स्पर्धेत गात असल्यापासून श्रेया घोषालचे अनेक चाहते आहेत. तिच्या अत्यंत सुरेल आणि गोड गळ्यातून गाणी ऐकणे मनाला फारच सुखावते. त्यामुळेच तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या हेच चाहते दिग्दर्शक करण जोहरवर नाराज आहेत.
कारण काय?
करणवर चाहते नाराज का आहेत, असा प्रश्न साहजिक तुम्हाला पडेल. तर त्याचं कारण आहे, करणची ड्रीम टीम. त्याचं झालं असं की, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’तील ‘तुम क्या मिले’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. परंतु आता या गाण्यावरून श्रेया घोषालचे चाहते करण जोहरवर चांगलेच नाराज झाले आहेत. करणने नुकताच या गाण्याचा एक टीझर शेअर केला. यामध्ये त्याने ड्रीम टीम असं लिहीत करण जोहर, प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजीत सिंह यांची नावं लिहिली. परंतु श्रेया घोषालनेही हे गाणं गायलं असून या यादीमध्ये तिचं नाव नाही. त्यामुळे आता नेटकरी करण जोहरवर टीका करत आहेत.
रणवीर – आलियाची प्रमुख भूमिका
‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यावरूनच श्रेया घोषालचे चाहते करण जोहरवर चांगलेच नाराज झाले आहेत.
नेटिझन्सची नाराजी
या पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिलं, “यामध्ये श्रेया घोषालचं नाव कुठे आहे?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “या गाण्याची सुरुवात गायिकेच्या आवाजाने होते. तरी तू त्यासाठी तिला क्रेडिट दिलं नाहीस. हे तू खूप चुकीचं केलंस.” तर तिसरा नेटकरी म्हणाला, “गायिकेला क्रेडिट न देणं ही आता त्याची सवय बनली आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “तू श्रेयाला क्रेडिट दे नाहीतर नको देऊस, या गाण्याच्या सुरुवातीला तिने जी तान घेतली त्यावरूनच आम्ही तिला ओळखलं. ती सर्वोत्कृष्ट आहे आणि तिचा आवाज आमच्या हृदयात आहे. तिला तुझ्याकडून वेगळं क्रेडिट मिळण्याची गरजच नाही.” नेटकरी त्याच्यावर टीका करू लागल्याने करणने या पोस्टच्या कमेंट लिमिटेड केल्या. करण जोहरचा हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.