नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची त्यांच्या निवासस्थानी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोहिया यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्यावर पोलिसांना संशय आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आरोपींनी आधी लोहिया यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर बाटलीचा वापर करून त्यांचा गळा कापला. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
पोलिस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले की, ही “अत्यंत दुर्दैवी” घटना आहे. फरार असलेल्या जसीर नावाच्या घरगुती सहाय्यकाला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, संशयिताने ५७ वर्षीय लोहिया यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. लोहिया यांची ऑगस्टमध्ये केंद्रशासित प्रदेशातील जम्मू आणि काश्मीरचे तुरुंग महासंचालक म्हणून पदोन्नती करण्यात आली होती.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (जम्मू प्रदेश) मुकेश सिंग यांनी सांगितले की, लोहिया यांचे वय ५२ होते. ते १९९२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शहराच्या बाहेरील उदयवाला येथे त्यांचे निवासस्थान आहेत. तेथेच त्यांचा गळा चिरलेला आणि शरीरावर भाजलेल्या खुणा आढळून आल्या. लोहिया हे पायाला काही तेल लावत असावेत. कारण, त्यांच्या पायाला सूज दिसून आली आहे.
सिंग यांनी सांगितले की, मारेकऱ्याने लोहिया यांचा सर्वप्रथम गळा दाबून खून केला. नंतर केचपच्या तुटलेल्या बाटलीचा वापर करून त्यांचा गळा चिरला. त्यानंतर मृतदेह पेटविण्याचाही प्रयत्न केला. निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लोहिया यांच्या खोलीत आग लागल्याचे दिसले. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी तो तत्काळ तोडला.
सिंग म्हणाले की, ‘घरगुती मदतनीस फरार आहे. त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. फॉरेन्सिक आणि गुन्हे पथक घटनास्थळी आहे. तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलीस परिवार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत आहे.
Director General of J&K (Prisons) Hemant Lohia murdered at his residence in Jammu: Police
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2022
Director General of J&K (Prisons) Hemant Lohia murdered at his residence in Jammu
Crime