पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – या वर्षी विद्यार्थ्यांचा आयटीआय अभ्यासक्रमाकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दहावीत १०० टक्के गुण मिळालेल्या ५३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले असून यात ४७ मुले तर ६ मुली आहेत. यंदा ६ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनीदेखील दहावीनंतर आयटीआय अभ्यासक्रमाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. आयटीआय अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्यांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इंजीनिअरिंग व इतर ठराविक अभ्यासक्रमांना प्राधान्य देणारे टॉपर विद्यार्थी आता आयटीआयकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर केली आहे. या यादीनुसार गुणवंत विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे असल्याचे दिसून आले. यंदा एकूण ३ लाख ८ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. यात २ लाख ६७ हजार २३५ मुले, तर ४१ हजार १९८ मुली आणि ६ ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. अंतिम गुणवत्ता यादी देखील जाहीर झाली आहे. २९ जुलै रोजी पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ३० जुलै रोजी सकाळी वाजल्यापासून ३ ऑगस्ट रोजी प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती.
१ सप्टेंबरपासून राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआय प्रशिक्षण केंद्र १ सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केल्या आहेत. तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्यासाठी ३० जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर झाली. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी ८ ते १२ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यंदा सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून या १ लाख ४९ हजार २६८ जागांवर प्रवेश प्रक्रिया होईल. राज्यातील आयटीआयमध्ये पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमांसोबतच नावीन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. या शिक्षणातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळत आहेत. गेल्या तीन वर्षात आयटी, कॉम्प्युटर, एअररोनॉटिक्स, रोबोटिक्स अशा विषयांना धरून अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुढे चांगली रोजगाराची संधी मिळते. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर सुद्धा रोजगार उपलब्ध आहेत. अकरावी आणि इंजिनिअरिंगला प्रवेश न घेणारे विद्यार्थी ठरवून आयटीआयला प्रवेश घेतात.
राज्यातील आयटीआय कॉलेज व जागांची संख्या (आयटीआयचे प्रकार आयटीआयची संख्या एकूण जागा)
सरकारी आयटीआय – ४१९ / एकूण जागा – ९३ हजार ९०४
खासगी आयटीआय – ५५३ / एकूण जागा- ५५ हजार ३६४
एकूण आयटीआय – ९७२ / एकूण जागा- १ लाख ४९ हजार २६८
Diploma, Engineering Pharmacy Students Preference Admission
ITI