मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालेय शिक्षणानंतर तंत्र शिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील तीन वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के होत असलेली वाढ यावर्षी १५ टक्के झाली आहे. या प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आता ८५ टक्के झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०१८ – १९ मध्ये ४१ टक्के होती, ही संख्या २०१९ – २० मध्ये ५० टक्के तर २०२०-२१ मध्ये ६० टक्के आणि २०२१-२२ मध्ये ७० टक्के होती. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षांत ही संख्या ८५ टक्के एवढी विक्रमी झाली आहे. पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्थांनी व अध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे सांगून पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवावा, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत आहे. शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांचा ओघ या क्षेत्राकडे वाढला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता एकूण प्रवेशक्षमता सुमारे १ लाख आहे. पदविका अभ्यासक्रमांसाठी एकूण ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. विभागनिहाय विचार केल्यास अमरावती विभाग ९१ टक्के, औरंगाबाद विभाग ८६ टक्के, मुंबई विभाग ८२ टक्के, नागपुर विभाग ६८ टक्के, नाशिक विभाग ७८ टक्के व पुणे विभाग ९० टक्के असे प्रवेश झाले आहेत. तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या सहकार्याने रोजगार देणारे क्षेत्र म्हणून हे विकसित करावे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
Diploma Engineering Admission Seats State Govt Decision