विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटींचे मुंबई आणि लगत उपनगरांमध्ये आलिशान बंगले आहेत. आता यामध्ये दीपिका आणि रणवीरच्या बंगल्याची भर पडली आहे. कारण दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंह यांनी मुंबईच्या अलिबागमध्ये २२ कोटी रुपयांमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. सुमारे ९ हजार चौरस मीटर जागेवर बांधलेल्या या बंगल्यात ५ बेडरूम आहेत. बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांसाठी हॉलीडे म्हणजे सुट्टीतील घर असते. दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या आधी शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आणि राहुल खन्ना यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांचे फार्महाऊस या भागात बनवले आहेत.
दीपिका आणि रणवीर सध्या मुंबईच्या प्रभादेवी परिसरात एका आलिशान 4 BHK फ्लॅटमध्ये राहतात. दीपिका पदुकोणने तो २०१० मध्ये खरेदी केला होता. तसेच लग्नानंतर ती रणवीरसोबत तेथे राहायला गेली.दोघांनी आपापल्या कंपन्यांद्वारे आता नवीन बंगला खरेदी केला आहे. या बंगाल्याचे खरेदीदार के.ए एंटरप्रायझेस एलएलपी आणि आरएस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहेत. दीपिका ही के.ए. एंटरप्रायजेसमध्ये भागीदार आहे, तर रणवीर आरएस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंटमध्ये दिग्दर्शक आहे. सदर मालमत्ता ही राजेश एस जग्गी कडून खरेदी करण्यात आली आहे. या बंगल्यासाठी दोघांनी १ कोटी ३२ लाखाचे मुद्रांक शुल्क भरले आहे.
दरम्यान,रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण गेल्या आठवड्यात अलिबाग येथील रजिस्ट्रार कार्यालयाबाहेर दिसले होते. अलिबागमधील रजिस्ट्रार कार्यालयातून दोघांचा बाहेर पडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर दीपिकाचा हात धरून ऑफिसमधून बाहेर पडत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केली असून त्यात दोन बंगले आहेत. याशिवाय नारळ आणि सुपारीची बागही आहे. अलीकडच्या काळात सेकंड होमची ( दुसऱ्या घरांची ) मागणी वाढली आहे. कोविड 19 मुळे लोक मुंबईच्या जवळच्या भागात पर्याय म्हणून दुसरे घर खरेदी करत आहेत. कारण वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे त्याला प्रोत्साहन मिळत आहे.