नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यासह सहा जणांविरुध्द मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पश्चिमधून सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहे. त्यांची उमेदवारी निश्चित असतांना त्यांच्या मुलावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे.
नाशिकमध्ये तीन वर्षापूर्वी सिडको परिसरात आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजर यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा काही दिवसापूर्वीच दाखल करण्यात आला होता.
आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली होती.. या आरोपींनी दीपक बडगुजर यांचे नाव सांगितल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावेळेस पत्रकार परिषद घेत सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने नाशिकचे पोलिस आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचे नाव घेण्यासाठी दबाब आणत असल्याचे सांगितले.