मुंबई – ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर (७९) यांचे निधन झाले. तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ ते पत्रकारितेत सक्रिय होते. यकृतात संसर्ग झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार घेत असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
इंग्रजी वृत्तपत्रातील उपसंपादक आणि नंतर दैनिक लोकमतचे समूह संपादक असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास आहे. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना म्हटले आहे की, ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे.