नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले असून भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील हे बंड करुन मनसे कडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या यादीत नाशिक पश्चिममधून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कालच त्यांनी निर्धार मेळावा घेतल्यानंतर आज ते मनसेकडून उमेदवारी करण्याचा निर्णय़ घेतला असल्याचे सांगण्यात आले. मनसेने आपली दुसरी यादी जाहीर केली. पण, या यादीत नाशिक जिल्ह्यातून एकही उमेदवारी घोषीत केलेली नाही. आता दिनकर पाटील यांचे नावे पुढे आले आहे.
भाजपने नाशिक जिल्ह्यातील विदयमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पण, या यादीत नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव नाही. ज्या चार विद्यमान आमदारांना संधी दिली. त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिका-यांचा विरोध आहे. पण, पक्षाने हा विरोध डावलून त्यांनाच संधी दिल्यामुळे भाजपला विरोधी पक्षांबरोबर लढण्याअगोदर स्वकीयांशीच अगोदर सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या चारही जागा रेड झोनमध्ये आहे.