नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील हे बंड करुन उमेदवारी करणार असल्याचे आज त्यांनी निर्धार मेळाव्यात घोषीत केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या यादीत नाशिक पश्चिमधून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तर दुसरीकडे महानगरपालिकेत स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते तुतारी फुंकणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना मोठे आव्हान तयार होणार आहे.भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या यादीत नाशिक जिल्ह्यातील विदयमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण, या यादीत नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव नाही. ज्या चार विद्यमान आमदारांना संधी दिली. त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिका-यांचा विरोध आहे. पण, पक्षाने हा विरोध डावलून त्यांनाच संधी दिल्यामुळे भाजपला विरोधी पक्षांबरोबर लढण्याअगोदर स्वकीयांशीच अगोदर सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या चारही जागा रेड झोनमध्ये आहे.
या पहिल्या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॅा. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॅा. राहुल आहेर यांनी माघार घेतली होती. येथे त्यांचे बंधु केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा डॅा. राहुल आहेर यांनाच संधी दिली. त्यामुळे येथे आज देवळा येथील नगराध्यक्षासह नगरसेवकांनी राजीनामा दिले आहे.