दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पटसंख्या वाढावी, यासाठी शासनस्तरावर नवनवीन उपक्रम राबविले जातात. खाजगी शाळेपेक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किती सरस आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तर दुसरीकडे आपल्या वर्गातील पटसंख्या वाढवू नये, यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांची हेळसाड करत वर्गात घेण्यासाठी भांडाभांड करतात, याची प्रचिती दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या प्रकारावरुन लक्षात येते.
जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थीनीला इयत्ता 3 रीत प्रवेश नाकारल्याबाबत तक्रार करत कार्यवाहीची मागणी पालकांनी निवेद्नाव्दारे गटशिक्षणधिकारी भास्कर कनोज यांच्याकडे केली आहे. कु. आरोही ही दरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 2 रीत शिक्षण घेत होती. पुढील शिक्षणासाठी तिला मामाच्या गावी जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी आणले. जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांकडून दाखल्याबाबत मागणी अर्जानुसार दि. 20 जुलै 2022 रोजी मुख्याध्यापकांना दाखला दिला. आणि जानोरी येथील शाळेत इयत्ता 3 रीमध्ये दाखल केले.
येथील शाळेत इयत्ता 3 रीचे दोन तुकड्या आहेत. मुख्याध्यापकांनी पालकाला 3 रीच्या वर्गात मुलीला बसविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलीला 3 रीच्या दोन्ही तुकड्यामध्ये घेवून गेले असता दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थीनीला आपल्या वर्गामध्ये बसून देण्यास नकार दिला. यावेळी दोन्ही शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोर भांडाभांडी झाली. पालकाला मुख्याध्यापकाकडे पुन्हा मुलीला घेवून जाण्यास सांगितले. मुख्याध्यापकांकडे मुलीला घेवून गेले असता तेथे गावातील दोन ओळखीची माणसे होती. त्यांनी पालकाला मुलीला येथेच राहु द्या, मुख्याध्यापक वर्गात बसवतील, तुम्ही घरी जा असे सांगितले.
त्यावरुन सदर पालक घरी गेले. त्यानंतर संध्याकाळी मुलगी घरी गेल्यानंतर मुलीने रडण्यास सुरुवात केली. त्याचे कारण विचारले असता मी दिवसभर मुख्याध्यापकांकडे एकटीच बसले होते. मला वर्गात बसू दिले नाही. आता मी शाळेत जाणार नाही, असे सांगितले. तिची समज काढण्याचा प्रयत्न केला. परंतू शिक्षकांचे भांडण बघुन ती शाळेत जाण्यास तयार होत नाही. या कारणांमुळे तिचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आम्हाला भिती वाटते. आम्ही आदिवासी व गरीब कुटूंबातील असल्याचे आमचे कोणी ऐकत नाही असे वाटते. शाळेतील मुख्याध्यापकांचे हे शिक्षक ऐकत नाही. त्यामुळे काहीतरी कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याबाबतचे निवेदन गटशिक्षणधिकारी भास्कर कनोज यांना पालकांनी दिले आहे. आता गटशिक्षणधिकारी कोणता निर्णय घेवून चुकीच्या प्रथेला पूर्णविराम देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कायम वादाच्या भोवर्यात आहेत. शाळेच्या भवितव्यासाठी हे नक्कीच घातक आहे. यामुळे शाळेची प्रगती थांबुन विद्यार्थ्यांच्या भौतिकविकासास अडथळा निर्माण होत आहे. याविषयी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन तत्काळ यावर कायमस्वरुपी उपाय व्हावा, यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल.
– सोमनाथ वतार (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, जानोरी)
जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारी कायम येत आहे. समज देवूनही सुधारणा होत नसल्याने संबंधित मुख्याध्यापक अकार्यक्षम असल्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला जाईल. त्याबाबत वरिष्ठ स्तरावरुन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– भास्कर कनोज (गटशिक्षणधिकारी, दिंडोरी)
Dindori Zilha Parishad School Reject Girl Student Admission