दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा मतदारसंघ असलेल्या दिंडोरीमध्येच आरोग्य सुविधांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वनारवाडी येथील महिलेचा अपुर्या सोयी-सुविधांमुळे मृत्यू झाल्याची तक्रार कुटूंबियाकडून होत आहे. दिंडोरी रुग्णालयातील अपुर्या सोयी-सुविधांची यानिमित्ताने पुन्हा चर्चा होत आहे.
तालुक्यातील वनारवाडी येथील चंद्रभागाबाई पर्बत नाईकवाडे या महिलेला २४ जून रोजी पहाटेच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यामुळे या महिलेला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात या महिलेला सर्पदंश प्रतिबंधक लस देण्यात आली. परंतु पुढील उपचारासाठी या महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असतानाच चंद्रभागाबाई नाईकवाडे मृत्यू झाला.
नाईकवाडे यांच्यावर वनारवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचेच प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्यारुपाने केंद्रात मंत्रिपद मिळूनही दिंडोरीची आरोग्य सुविधा फारशी चांगली नाही. राज्य सरकारकडे उप जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव धुळखात पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर नाईकवाडे यांचा जीव वाचला असता अशी चर्चा या निमित्ताने तालुक्यात होत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.