सुदर्शन सारडा
शरद पवारांसाठी बारामती नंतर सर्वाधिक सुरक्षित समजल्या गेलेल्या दिंडोरीवर दोन दशकांनंतर लोकसभेत भास्कर भगरे यांच्या रूपाने विजयी बहार दिसली. त्यामुळे वीस वर्षानंतर दिंडोरीतला आनंद समाधानाच्या कप्प्यात आजपावेतो मावला गेलेला नाही. अशातच घोषित झालेल्या विधानसभेच्या धामधुमीत हाच दिंडोरी सध्या राजकीय विचारात मग्न झाल्याने येथील नेते ‘नरहरी आणि बरंच काही’ असे बोलू लागल्याने येणाऱ्या दिवसांत निष्ठेची नेमकी कोणती समीकरणं उदयास येतात हे लवकरच स्पष्ट होईल. याच हायपर वातावरणात दादा प्रेमी नरहरी झिरवाळ निर्धास्त असल्याने त्यांचे गॉडफादर श्रीराम शेटे यांनी ‘शांतम शाश्वतम’ भूमिका स्वीकारलेली दिसते. या घडणाऱ्या घडामोडी पाहून शेटेंनीही सुनीता चारोस्कर यांना तुतारी देऊन एक डाव हातात ठेवल्याने त्यांचे दुसरे शिष्य खा.भास्कर भगरे मात्र वैचारिक पेचात सापडल्याचे चित्र आहे.
दिंडोरीत शरद पवार भक्ती अन् झिरवाळ यांची लोक युक्ती ही चर्चा उभ्या आडव्या पट्ट्यात असल्याने तीन खेपेचे आमदार नरहरी झिरवाळ मात्र आपण अजित पवार यांना सोडणार नसल्याचे सांगत आहे. यामुळे शेटे यांच्या समर्थकांनी तुम्ही रहा तुतारी कडे आम्ही मात्र झिरवळांनाकडे अशी दर्पोक्ती शेटेंनाच दिल्याची गुमान चर्चा आहे. सरत्या लोकसभेला दिसलेल्या एक जुटीवर यामुळे गटबाजीचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. झिरवाळ हे अजित दादांचे ऋण पाण्यात टाकू इच्छित नाही त्यामुळे ते घड्याळावर ठाम आहे. दुसरीकडे संतोष रेहरे यांना काही ठाकरे गटाच्या नेत्यांची पसंती आहे तर वणी पट्ट्यात मधुकर भरसट यांच्या हाती स्थानिक नेत्यांनी तुतारी देण्याचे मनसुबे आखले आहे. धनराज महाले यांना पाहिजे तसे काही मिळाले नसल्याने ते शिंदे गटाकडून लढण्यास इच्छुक आहे. तर गोकुळ झिरवाळ हे तुतारी घेतील असाही कयास लावला जात आहे. यात खा.भगरे यांना होम ग्राऊंडवर मनासारखा आपला आमदार माध्यम सोबती लागत असल्याने त्यांचा चारोस्कर यांना कितपत होकार मिळतो हे अभ्यासणे ही तितकेच महत्वाचे आहे.
दुसरीकडे सुनीता रामदास चारोस्कर यांच्या संसारिक जीवनाच्या श्रीगणेशात श्रीराम शेटे यांनी पितृत्वाचे दातृत्व निभावल्याने कदाचित शेटेंच्या मनात सुनिताताईंचे नाव फायनल असेलही पण खा. भगरे यांच्या पासून तळातल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेला सावरण्याचे काम शेटे अल्प दिवसांत कसे करतात हे बघणे महत्वाचे ठरेल. दुसरे राजकीय रंग अभ्यासले तर नरहरी झिरवाळ हे उमेदवारीला जयहरी म्हणत गोकुळ झिरवाळ यांना रामकृष्ण हरी म्हणायला लावतील अशीही चर्चा आहे. म्हणून बदलत्या राजकीय रंगात निष्ठे पेक्षा आमदारकीचा ऋतबा महत्वाचा समजला जात असल्याने नको डोक्याला ताण म्हणून द्या धनुष्यबाण नंतर पुन्हा पंधरा वर्ष माझ्याच अंगणात गातील माझ्यासह गोकुळचेही गुणगान अशी कविता नरहरी झिरवाळ दिंडोरीत बसून मनातल्या मनात म्हणत असतील ही..
दिंडोरीत उद्भवलेल्या परिस्थितीत शरद पवारांच्या विश्वासाला तडाही जायला नको अन् दुसरीकडे तुतारीही फुंकायची म्हटल्यावर श्रीराम शेटे मानस कन्या-जावयाच्या पारड्यात वजन टाकतात की झिरवाळ प्रेम फुलवता की आणखी काही राजनियम लावत नवीन चेहऱ्याला संधी देतात हे येणाऱ्या काही दिवसांतच समजेल. तोपर्यंत जय नरहरी अन् रामकृष्णहरी… तूर्तास मौंनम सुखी भव: