नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी – पेठ रोडवर आशेवाडी शिवारात पोलिसांनी ४ लाख ६९ हजार ७२० रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा व आयशर वाहन जप्त केले. या छाप्यात संशयित विशाल साळबा आंधळे (वय ३३, रा. मोरवाडी, सिडको, ता. जि. नाशिक) यास पोलिसांनी गजाआड केले आहे. आयशर वाहनातून या अवैध मद्यसाठयाची वाहतूक करतांना पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. दिंडोरी पोलीस ठाणेस प्रोव्हीबीशन गुन्हा रजि. दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोउपनिसंजीव पाटील, सपोउपनि शिवाजी ठोंबरे, पोलिस वसंत खांडवी, प्रकाश तुपलोंढे, उदय पाठक, गोरख पवार, गौरव सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. जिल्हयात अवैधरित्या सुरू असलेल्या व्यवसायाविषयी नागरीकांना काही माहिती द्यावयाची असल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे हेल्पलाईन क्रमांक ६२६२ २५ ६३६३ यावर संपर्क साधावा, माहिती देणा-यास त्याचे नाव विचारले जाणार नाही व त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आवाहन केले आहे.