दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी आश्रम ( दत्त महाराजांचे आजोळ ) चे ठाणापती ब्रम्हलीन महंत सुभाषगिरी महाराज तथा शिवदासजी महाराज यांचा संन्यासी आखाड्यांतील महत्त्वाचा मानला जाणारा षोडशी विधी अनेक आखाड्यांचे साधु, महंत,पुरोहित व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत वैदिक पध्दतीने पार पडला. महाराजांच्या निर्वाणानंतर पंधरा दिवस भजन ,भागवत कथा, नामवंत किर्तनकारांची किर्तने आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती दिंडोरी बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी दिली.
प्रारंभी महाराष्ट्र पुरोहित महासंघाचे शांताराम भाणसे,पंडित मधुकर जोशी यांनी सुभाषगिरी महाराज यांच्या समाधी स्थळांची संन्यासी आखाड्यांच्या वैदिक पध्दतीने विविध मंत्रोच्चार उचारून महापुजा केली. त्यानंतर एक हजार गुरूमंत्राची आहुती महाराजांना समाधी स्थळी अर्पण करण्यात आली. यावेळी हजारो भक्तांच्या जयजयकारांने कंरजी परिसर दुमदुमदुमून गेला होता.
गुरू शिष्य परंपरेचा अदभूत सोहळा
आखिल भारतीय श्री पंच दशनाम जुना आखाडा यांच्या परंपरा अनुगत कंरजी आश्रमांचे ठाणापती सुभाषगिरी महाराज यांच्या षोडशी विधी व गुरू शिष्य परंपरेचा अदभूत सोहळा संपन्न झाला. यासाठी कुंभ नगरी त्र्यंबकेश्वर येथून समस्त आखाडा परिषद व त्र्यंबक मंडल व श्री आखिल व श्री आखिल भारतीय पंच दशमान जुना आखाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीश्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, सचिव अजयपुरीजी ,सुखदेवगिरीजी, विष्णुगिरी वैजापूर, नीलकंठ गिरीजी,सचिव ईच्छा गिरीजी महाराज, छबीपुरी,दयानंद भारती,महेंद्रपुरी ,जयगिरी, रामप्रसाद गिरी, परमेश्वर गिरी,तसेच भारत माता आश्रम चे श्री महंत जनेश्वरगिरी,आनंद आखाड्यांचे सर्वानंदसरस्वती,आव्हान आखाड्यांचे पर्वतगिरी धर्मपुरी महाराज, व इतर समस्त आखाड्यांचे महंत व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प.पु.शारदा देवी, पोहेगाव आश्रम, भागवताचार्य मनिषादिदी निवाणेकर,हभप भागवताचार्य बंडा महाराज लखमापुरकर,विठ्ठल महाराज वैजापुरकर आदी उपस्थित होते.
वैदिक मंत्राचा जयघोष
वैदिक मंत्राचा जयघोषात महाराजांचा रूद्र अभिषेक पुजन, माल्यार्पण, वस्त्र,गंध, अक्षदा, पुष्पांजली याने समस्त आखाडा परिषदेच्या साधु संतांच्या उपस्थितीत व मंदिर समिती विश्वस्त तसेच भक्तगण यांची उपस्थिती. तसेच यावेळी जुना आखाडा चे महंत विष्णुगिरी यांचा चादर विधी सोहळा विधी संपन्न झाला.