दिंडोरी- दिंडोरी तालुक्यातील श्री.गुरुदत्त देवस्थान क्षेत्र करंजी (दत्तात्रय महाराजांचे आजोळ) आश्रमांचे ठाणापती महंत परमपूज्य श्री शिवदास गिरीजी महाराज (सुभाषगिरी महाराज) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांचा समाधी सोहळा शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता दत्तकरंजी देवस्थान येथे होणार असल्याची माहिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील यांनी दिली.
महंत सुभाषगिरी महाराज यांचे वय ८० होते. त्यांनी करंजी आश्रमांचे ठाणापतीपद स्विकारल्यानंतर आश्रमात विकासांची गंगा निर्माण केली होती. त्यांनी जवळजवळ २१ वर्ष मौन पाळल्यामुळे त्यांना मौनीबाबा या नावांने संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. त्यांनी अनाथ मुलांसाठी शाळा,आदिवासी मुलांसाठी शाळा,इंग्रजी शाळा सुरू केली. त्यांनी आश्रमात अन्नदान क्षेत्र,गोरगरिबांच्या मुला मुलीसाठी मोफत शिक्षणांचे वसतिगृह,अनेक वार्षिक सप्ताह, धार्मिक विधी कार्यक्रम, इ.निर्माण करून संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. गुरुवारी संध्याकाळी महाराजांचे बातमी भाविक भक्तांना समजताच करंजी आश्रमांकडे भाविकांची दर्शनांसाठी गर्दी वाढु लागली आहे. महाराजांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यांवर शोककळा पसरली असुन समाधी सोहळ्यासाठी अनेक महंत उपस्थित राहणार आहे. यावेळी दत्तात्रय पाटील, वाल्मिक मोगल, गंगाधर निखाडे, आदींसह भाविकांनी दु:ख व्यक्त केले आहे.