दिंडोरी – तालुक्यातील लखमापुर येथील शिवारातील नामकिंत मेगाफाईन कंपनीत स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एक ठार व चार जण जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की लखमापुर शिवारातील मेगाफाईन ही एक तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील नामकिंत कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीत २१ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान जे काही विभाग आहे त्यातील एका विभागातील रिअँक्टर मशिनला अचानक आग लागुन स्फोट झाला.यामध्ये त्या विभागांमध्ये काम करणारे कामगार केशव सुनीराम धुळे, रा.ननाशी ता.दिंडोरी, बाजीराव निवृत्ती चव्हाण रा.अंजनेरी ता.त्र्यंबकेश्वर, रवींद्र गोपाळा गो-हाळे रा.दोनवडे ,हे किरकोळ जखमी झाले असून ,कमलेश रमेश गवळी व संदिप वसंत गायकवाड रा.मडकीजांब ता.दिंडोरी हे गंभीर जखमी झाले. त्यात उपचारादरम्यान संदिप गायकवाड यांचा मुत्यू झाला आहे.
सदर घटनेची खबर कंपनीचे प्राँडक्शन आधिकारी प्रमोद बाळकृष्ण बच्छाव यांनी तात्काळ वणी पोलिसांना कळवली. वणी पोलिसांत अकस्मात जळीत प्रकरण म्हणून नोंद करण्यात आली असुन पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतन पगार, पी.आर शेलार ,धुळे इ. पोलीस वर्ग तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मडकीजांब येथे शोककळा
या घटनेत गंभीर जखमी झालेले संदिप गायकवाड यांचे निधन झाल्याने संपूर्ण कामगार व दिंडोरी ,मडकीजांब येथे शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळाऊ कामगार म्हणून संदिप गायकवाड यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन अपत्य असा परिवार आहे. लखमापुर परिसरातील आरसी कंपनी, एव्हरेस्ट, सर्व स्टिल कंपनी, गोदावरी पेपर मिल व इतर सर्व कंपन्यातील कर्मचारी व कामगारांनी हळहळ व्यक्त केली आहे.