दिंडोरी- दिंडोरी ग्रामीण भागात मेंदूवरील गुंतागुंतिची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत यशस्वीपणे पूर्ण केल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना धन्यवाद दिले आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती व मजूरीचे काम करणाऱ्या कुटूंबातील पार्वतीबाई मोतीराम जोपळे वय ४५ वर्ष यांना व ताप, डोकेदूखी चा खूप त्रास होत असतांना त्या घरीच बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने दोन दिवस त्यानी घरीच उपचार केले. पण काही फरक जाणवला नाही. याबाबत दिंडोरी येथील डॉ. महेंद्र वाघेरे यांनी तात्काळ त्यांच्या आजाराचे निदान करून त्याना दिंडोरी येथील श्री. दत्त कृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल Emergency मध्ये ऍडमिट केले. यावेळी सिटी स्कॅन केले असता मेंदूला सूज व पु संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. शस्रक्रिया करण्याबाबत नातेवाईकांनी नाशिक येथे चौकशी केली असता कमीत कमी २.५ लाख रुपये खर्च येईल अशी माहिती त्याना मिळाली. त्यावेळेस डॉ. राजेंद्र वराडे (डायरेक्टर) यांनी हेच ऑपरेशन आपण आपल्याच दिंडोरी येथे का होणार नाही ? यावर त्यांनी नाशिकचे मेंदूविकार तज्ञ डॉ. अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधून रुग्णाची परिस्थिती सांगितली व हे ऑपरेशन दिंडोरी येथे सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या श्री दत्त-कृपा सुपर सोशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याचे ठरविण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली व रुग्ण व्हॅरीलेटरवरून सुखरूप शुद्धीवर आल्यावर नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला व सर्वांच्या डोळ्यात आनंद वाहू लागला. नातेवाईकांनी मेंदू विकार तज्ञ डॉ. अनिल जाधव, एम डी मेडिसिन डॉ महेंद्र वाघेरे, एम एस व स्त्री रोग तज्ञ डॉ. राजेंद्र वराडे यांचे व महात्मा ज्योतीराव फूले जनआरोग्य योजनेचे आभार मानले आहे.