दिंडोरी – अत्यंत दुरवस्था झालेल्या तालुक्यातील वलखेड निगडोळ ननाशी या रस्त्याचे नूतनीकरण कामास सूरुवात झाली आहे. मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत निविदेतील नियोजन व अंदाजपत्रका प्रमाणे काम होत नाही तो पर्यंत काम होवू न देण्याचा पवित्रा घेतला असता बांधकाम अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करत कामाचा योग्य तो दर्जा राखत काम दर्जेदार करण्याचे ठेकेदारास बजावले आहे.
गेली अनेक वर्षांपासून वलखेड फाटा ते ननाशी या रस्त्याची दुरवस्था झाली होती. अखेर या रस्त्याचे मजबुतीकरण नूतनीकरण काम सुरू झाले. मात्र सदर काम हे निकृष्ट होत असल्याचे समजताच वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, अनंत पाटील, राकेश शिंदे आदींनी रस्त्याची पाहणी करत निकृष्ट काम सबधितांच्या निदर्शनास आणून दिले. बांधकाम विभागाचे उपअभियंता नंदकुमार अहिरे यांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत तक्रारी करत सदर काम हे निविदेतील नियोजन अंदाजपत्रक नुसार चांगल्या दर्जाचे व्हावे असे सांगितले. अभियंता अहिरे यांनी ठेकेदारास कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना दिल्या तसेच काम चांगल्या दर्जाचे होईल असे आश्वासन दिले. यावेळी वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, अनंत पाटील, मच्छिंद्र पवार, गंगाधर निखाडे, राकेश शिंदे, संतोष वाघ, शिवाजी पिंगळे, मंगला शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.