दिंडोरी -कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, दिंडोरी तालुक्यात लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. तालुक्यातील अनेक केंद्रावर नागरिकांची भांडण होताना बघायला मिळत आहे. 10 वाजेपासून लसीकरण सुरू होणार असले तरी नागरिकांनी मात्र सकाळपासूनच रांगा लावलेल्या आहेत. मोहाडी येथील लसीकरण केंद्रावर मोहाडी परिसरातील नागरिकांपेक्षा पर जिल्ह्यातील नागरिक बुकिंग करून लस घेत आहेत. तर स्थानिकांना मात्र तासनतास उभे राहूनही लस मिळत नाही. त्यामुळे भांडणाचे मोठे प्रकार दिसून येत आहे. शनिवारी फक्त 100 लशीचे डोस उपलब्ध झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत 12 गावे येत असल्याने तेथील लोकप्रतिनिधीसह मोहाडीचे माजी उपसरपंच सुधाकर सोमवंशी, लक्ष्मण देशमुख, शंकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मोहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला, यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ लोणे यांनी नागरिकांची समजूत काढत मार्ग काढला.
दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात मनसेचे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले, अमर राजे, रणजित देशमुख, संदीप बोरस्ते, नितीन देशमुख, दिलीप बोरस्ते, निलेश शिंदे, आदींनी लसीकरणाबाबत डॉ विलास पाटील यांना जाब विचारला, येथील ग्रामीण रुग्णालय जिल्हा बाहेरील नागरिक येऊन लस घेतात, मात्र दिंडोरी शहरातील नागरिकांचा रांगेत उभे राहूनही नंबर लागत नाही, तालुक्यातील जनता अशिक्षित आहे, त्यांना रजिस्ट्रेशन जमत नाही, मजुरांना तासनतास उभे राहूनही लसीकरनास नंबर लागत नाही, आदी समस्या मांडल्या, यावेळी डॉ विलास पाटील यांनी नागरिकांची समजूत काढत दुपारी शहरातील 60 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, एकीकडे लसीकरणामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट होत आहे, त्यामुळे नागरिक मात्र हजारोच्या संख्येने शासकीय रुग्णालयाबाहेर रांगा लावत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोकं आल्याने एकच गोंधळ उडालेला आहे.
नागरिकांनाही मनस्ताप होणार नाही
खाजगी केंद्रांवर ही लस उपलब्ध नसल्यामुळे अखेर शासकीय केंद्रांवर यावे लागले. आता मात्र शासकीय केंद्रांवरही मोजकाच साठा उपलब्ध असल्याने नागरिक यांचा संयम सुटू लागला आहे. तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट गर्दी दिसून येत आहेत. गेले काही दिवस तालुक्यात येणारा साठा कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे असलेल्या साठ्याचे व्यवस्थित नियोजन आणि नागरिकांना मार्गदर्शन केले तर लसीकरणाची ही मोहीम अखंडपणे चालू राहील आणि नागरिकांनाही मनस्ताप होणार नाही.
वणी , मोहाडी त गर्दी स्थानिक बाहेरचे लाभार्थी वाद
वणी येथे कोव्हीशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू आहे. मात्र येथे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेले जिल्हा व जिल्ह्याबाहेरील लाभार्थी येत असून स्थानिक नागरिक ही गर्दी करत आहे. यावरून स्थानिक व बाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये तसेच लसीकरण कर्मचारी यांच्यात वाद होत असून लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत आहे. मोहाडी येथे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण केंद्र सूरु असून येथे फक्त ऑनलाईन नोंदणी व उपलब्ध वेळ बुकिंग असणाऱ्यांना लस दिली जात आहे. यात सदर बुकिंग रात्री सुरू होते व काही क्षणात स्लॉट फुल होत आहे. त्यामुळे येथे ज्यांचा नंबर लागत आहे ते येत आहे त्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरून लोक येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.