दिंडोरी : तालुक्यातील वलखेड फाटा येथे दत्तकृपा मंगल कार्यालयात उदया मंगळवार २३ रोजी दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय पेन्शन परिषद व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सचिन वडजे यांनी दिली.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अन्यायकारक अशी नवी पेन्शन योजना लागू केली आहे या पेन्शन योजनेत शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलीही सुरक्षितता मिळालेली नसून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुठल्याही प्रकारचे लाभ मिळत नसल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची हलाखीची अवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे.
येत्या २२ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचे संयोजक वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथून संपूर्ण राज्यभर सर्व संघटना समन्वय समिती मार्फत पेन्शन संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून यात जुनी पेन्शन बाबत जनजागृती करणे व कर्मचाऱ्यांना आपले हक्क मिळवून देणे यासाठी विविध उपक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे..
नाशिक जिल्ह्यात दिनांक २३ रोजी पेन्शन संघर्ष यात्रा येणार असून दिंडोरी येथे जिल्हास्तरीय पेन्शन परिषद व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाभरातून सर्व कर्मचारी संघटना पदाधिकारी, शिक्षक संघटना पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित राहावे असे आवाहन जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.