दिंडोरी – तालुक्यातील रस्ते वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे,तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले, मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी कणखर भूमिका घेत आंदोलन शिवसेनेचे असून त्यात भाजपला नो एंट्री केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेत पुढे काही काळ रस्त्यावर ठाण मारत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
शिवसेना कार्यालय ते पालखेड चौफुली पर्यंत हातात भगवे झेंडे घेऊन रॅली काढत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील लोकप्रतिनिधी यांचेकडून दुर्लक्ष होत आहे. तरी त्वरित सर्व रस्त्यांची कामे सुरू करावी ज्या रस्त्यांची कामे मागील काळात झाली त्याचे दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असताना दुरुस्ती होत नाही. तरी अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल तसेच वीज मंडळाने सबुरीने घ्यावे वीज पुरवठा सुरळीत ठेवावा वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असे जिल्हाप्रमुख पाटील यांनी सांगितले. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले,माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सहकार नेते सुरेश डोखळे,माजी गटनेते प्रवीण जाधव, यांनी विद्यमान आमदार यांचे कारभारावर टीकास्त्र सोडले. माकप तालुका सरचिटणीस रमेश चौधरी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी शहरप्रमुख संतोष मुरकुटे, उपजिल्हाप्रमुख,कैलास पाटील, नाना मोरे, सदाशिव गावित,वसंत थेटे, सुरेश देशमुख, सुनील मातेरे, किरण कावळे, डॉ. विलास देशमुख,नदीम सय्यद, सचिन देशमुख, सोनू देशमुख, निलेश शिंदे,अविनाश वाघ, नगरसेविका शैला उफाडे, सुमन घोरपडे, रत्ना जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय देशमुख यांनी तालुक्यातील रस्त्यांचे ६० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून दिवाळीनंतर लगेचच कामना सुरुवात करण्यात येणार आहे असे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, सूत्रसंचालन व आभार तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी मानले, आंदोलनामुळे दिवाळी निमित्ताने आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले, सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
शिवसेनेच्या आंदोलनात भाजपाला नो एंट्री
तालुक्यातील रस्ते वीज आदी विविध प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिवसेनेचे आंदोलन होणार होते. त्यात ते राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष एकत्र येत होणार या मथळ्याखाली सोशल मीडियावर आवाहन केले गेले. चौफुलीवर सकाळी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन सुरू होताच या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख नगरसेवक तुषार वाघमारे, रणजित देशमुख यांचेसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मात्र त्यास जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनी व शिवसैनिकांनी आक्षेप घेतला व भाजपाला आंदोलनात नो एंट्री असल्याचे सांगत हे आंदोलन अकार्यक्षम लोकप्रतिनिधी,इंधन दरवाढ केंद्र सरकार विरोधात असल्याचे सांगत आंदोलनातून जाण्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आंदोलनातून उठून जात समोरच रस्त्यावर ठाण मांडले. सत्ताधारी सरकारविरोधात घोषणाबाजी केली व लागलीच उठून जात तहसीलदार पंकज पवार यांना तहसील कार्यालयात निवेदन दिले. दरम्यान भाजपला आंदोलनात नो एंट्री केल्यानंतर शिवसेना नेत्यांनी स्थानिक आमदार, खासदार यांचे अकार्यक्षमते वर केंद्र सरकारवर इंधन दरवाढ व इतर मुद्द्यावर टीका करत सरकारने अच्छे दिन दाखवत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला . दरम्यान भाजप तालुकाध्यक्ष यांनी शिवसेनेचे आमंत्रण आल्याने आपण आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो असे सांगत झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. आम्हाला नो एंन्ट्री देणारे ते कोण, आम्ही स्वतंत्रपणे आंदोलन केल्याचेही भाजपतर्फे सांगण्यात आले.
या आहेत प्रमुख मागण्या
– तालुक्यातील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी
– शेतकऱ्यांची वीज बिल वसुली त्वरित थांबवावी
– बँकांची वसुली त्वरित थांबवावी
– इंधन दरवाढ थांबवावी