दिंडोरी : दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात भूकंपाचे 2.3 रिकटर स्केलचे सौम्य धक्के दिनांक 8 मे रोजी पहाटे 05:09 वाजता जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
दरम्यान मेरी संस्थेकडे 2.3 रिकटर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली असून नाशिकपासून 96 किलोमीटर वर भूकंपाचा केंद्रबिंदू होता अशी माहिती प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर,तहसीलदार पंकज पवार यांनी दिली.
सदर धक्क्यामुळे कुठलीही मनुष्य व वित्तहानी झालेली नाही. पहाटे भूकंपाचा आवाज होऊन परिसरातील गांडोळे,देहेरे कुईआंबी, उपिळपाडा, सावरपातळी,चीकाडी,शृंगारपाडा या गावातील घरांचे पत्रे हलू लागले घरांच्या भिंती हादरत असल्याचे जाणवले. जमीनही हादरल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. सदर परिसर आदिवासी वाडी वस्तीचा असुन डोंगराळ व घाटाचा आहे. मागील वर्षी याच दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावांमध्ये असणारे बसण्याचे बाकडे तुटुन पडले होते. तसेच गोठ्यातील जनावरे ही धावू लागली होती. याबाबत नागरिकांनी प्रशासनास माहिती कळवली होती . तरी भविष्यात पुन्हा भूकंपाच्या धक्क्यातून या भागात मनुष्य, वित्त हानी होऊ नये,यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच या परिसरात भूकंपमापन यंत्र बसवून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.