दिंडोरी : तालुक्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचे घुमशान सुरूच असून काल वरखेडा मातेरेवाडी बोपेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानंतर शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली असून दिंडोरी शहरासह अनेक गावांना तडाखा दिला आहे. पालखेड खडक सुकेने परिसरात ढगफुटी होत सारा परिसर जलमय करून टाकला असून द्राक्षबागांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत द्राक्षासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .काल वरखेडा दीड दोन तासात परिसरात ७३ मिमी तर आज खडक सुकेने येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.परिसरातील नाले ओहोळ दुथडी भरून वाहत असुन अनेक द्राक्ष बागांच्या गल्ल्यांमधून ओहोळ वाहत आहे.या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.दिंडोरी शहरासह पूर्व भागातील अनेक गावांना सकाळी ११ पासूनच पावसाने झोडपून काढले.
द्राक्ष पीक वाचविण्यासाठी पाणी चिखलात शेतकऱ्यांची औषध फवारणीची कसरत
गेल्या चार दिवसांपासून सारखा पाऊस पडत असल्याने द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पाण्याचा निचरा होतो कुठे की पुन्हा पाऊस होत असल्याने शेताचे तळे बनले आहे.नुकतेच छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढला असून या रोगाचा बचाव करण्यासाठी शेतकरी चिखल पाण्यात महागडे औषधे फवारणी करत पीक वाचविण्यासाठी धडपड करत आहे.टोमॅटो सोयाबीन मका आदी पिकांचा हातातोंडचा घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.