दिंडोरी – तालुक्यात आज सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली मात्र शुक्रवारी कादवा कारखाना वरखेडा मातेरेवाडी जोपुळ लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस होत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. येथील चिखली नाल्याला मोठा पूर जात नाल्याशेजारील शेतीचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी तीन च्या सुमारास विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काहीच वेळात सर्वत्र पाणीच पाणी झाले द्राक्ष बागा भाजीपाला पिकातून पाण्याचे लोंढे वाहू लागले. नुकत्याच छाटणी झालेल्या द्राक्षबागांना या पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे तर टोमॅटो सह विविध भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.तर काढणीस आलेल्या सोयाबीन भुईमुगाचे नुकसान झाले आहे.दिंडोरी, वलखेड,पालखेड कोराटे लखमापूर,खेडगाव जानोरी मोहाडी आदी विविध गावांनाही जोरदार पाऊस झाला आहे. दिंडोरी शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान पालखेड बंधारा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सायंकाळी ४.३० वाजता पालखेड धरणातून पाण्याचा जास्त विसर्ग करण्यात आल्याने कादवा नदीलाही पूर आला आहे.प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.