दिंडोरी : कोरोना प्रारदुर्भावामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले येथील विंध्यवासींनी डोंगरावरील श्री विंध्यवासींनी मातेचे मंदिर उघडले असून नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. मंदिर उघडल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान सरकारने ज्या अटी शर्ती टाकत मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्या अटींचे पालन करण्यात येत असून विश्वस्त मंडळातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या असून मंदिर प्रवेशद्वारावर भाविकांची थर्मल गण द्वारे तापमान मोजत प्रवेश दिला जात आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये ६ फुटाचे अंतर ठेवणे मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. आज पहिल्या दिवशी सकाळी श्री व सौ. राजेंद्रशेठ दुसाने यांचे हस्ते पंचामृत महाभिषेक करत विश्वस्त मंडळ सदस्य व भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. पुजारी योगेश जोशी यांनी पौरोहित्य केले. मंदिरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी अनेक भाविकांनी येथे घटस्थापना करत दर्शन घेतले. पहिल्या दिवशी कमी संख्येने भाविकांनी हजेरी लावली असून एक दोन दिवसात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने येथे भाविकांनी घटी बसण्यास तसेच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परिसरात यात्रेलाही बंदी घातलेली असून प्रसाद व पूजा साहित्य दुकानात हार गजरे आदी विकण्यास बंदी घातली असल्याने या दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर सुरू झाल्याने गेली अनेक महिने सुनासुना असलेला विंध्यवासींनी डोंगर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली आहे.
नवरात्रोत्सव कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शुक्रवार दि.8 रोजी सकाळी 10 व.कुंकुमार्चन शनिवार दि.9 रोजी सकाळी 10 वाजता, फलारचना,रविवार दि.10 रोजी छप्पन भोग फुलार्चना,सोमवार दि.11 रोजी सव्वामनी भोग,मंगळवार दि.12 रोजी दुपारी 12.30 वा आदिशक्तीचा गोंधळ,बुधवार दि.13 रोजी सकाळी 6 ते 12 नवंचंडी याग,दुपारी 12.30 ते एक कुमारिका पूजन,गुरुवार दि 14 रोजी सकाळी 10 श्रीयुक्त पूजन,शुक्रवार दि.15 घट उत्थापन विधी,मंगळवार दि.19 रोजी सकाळी 6 ते 8 कोजागिरी महाभिषेक ,रात्री 8 ते 12 दुग्धप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे.सदर सोहळ्यास भाविकांनी कोव्हिडं चे नियम पाळत सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
मंदिरे उघडण्याचा योग्य निर्णय
सरकारने मंदिरे उघडण्याचा योग्य निर्णय घेतला असून आम्ही दरवर्षी विंध्यवासींनी येथे घटस्थापना करत नंतर घरी घटस्थापना करतो .बऱ्याच दिवसानंतर मातेचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा आनंद आहे.भाविकांनी नियम पाळावे पुन्हा मंदिर बंद होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
शामराव जाधव
आनंदवल्ली नाशिक
काळजी घेत नवरात्रोत्सव साजरा करावा
विंध्यवासींनी मातेच्या मंदिर येथे अनेक भाविक घटी बसतात मागील वर्षी मंदिर बंद होते व घटी बसण्याची परंपरा खंडित झाली. यंदा मंदिर सुरू झाले मात्र प्रशासनाने घटी बसण्यास परवानगी नाकारली याबाबत नाराजी असली तरी प्रशासनास सर्व भाविकांनी सहकार्य केले आहे .सर्वांनी नियमांचे पालन करत काळजी घेत नवरात्रोत्सव साजरा करावा.
मनोज ढिकले
जिल्हा उपाध्यक्ष मनसे दिंडोरी.