दिंडोरी:- बैलगाडा शर्यती चालु करण्याबरोबरच संबंधित केसच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत मंत्री महोदयांच्या दालनात बैठक आयोजित करण्याची मागणी निवेदनाद्वारे विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत शौकीनांकडून करण्यात आली.
बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहे. पारंपरिक वारसा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देखील गाय-बैलाचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो. बैलांच्या संगोपनाबाबत शासनस्तरावर आजपर्यंत कोणतीही योजना प्रस्तावित नाही. बैलांच्या प्रदर्शन बंदीमुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती आहे. शर्यत बंदी मुळे देशी बैलाचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच शर्यत बंदी मुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते.
महाराष्ट्राने शासनाने यानुसार सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. (SUP 3526/2018) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची ही स्वतंत्र याचिका विस्तारित खंडपीठाकडे म्हणजेच पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केलेली आहे. तसेच त्यानंतर महाराष्ट्र शासनाने बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत समिती नेमून सदर समितीचा अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला आहे. सदर केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात मागील तीन वर्षात (फेब्रुवारी २०१८ पासून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. तरी नामदार झिरवाळ यांनी बैलगाडाबाबत माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचेशी समक्ष चर्चा करून या विषयांमध्ये लक्ष घालून माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तात्काळ घेतली जावी याबाबत प्रयत्न व्हावेत अशी आमची मागणी करून तसेच यासंबंधी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधी समवेत मा मुख्यमंत्री यांचे दालनात तात्काळ बैठक घेतली जावी अशी मागणी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत शौकीनांकडून केली. विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनीही ही मागणी मान्य करून लवकरच मुख्यमंत्री इतर संबंधित मंत्र्यासोबत बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.
तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू
बैलगाडा शर्यत शौकीनांकडून करण्यात येणारी मागणी रास्त असून त्याबाबत त्यांचे निवेदन प्राप्त झाले असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांबरोबरच इतर संबंधित मंत्रीमहोदयांसोबत ठराविक प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी आपण आवश्यक प्रयत्न करू.
– नामदार नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष