दिंडोरी : राज्यातील शहरी व ग्रामीण भागात जुगा-यांनी मोबाईलवरून ऑनलाईन रौलेट बिंगो खेळण्याचे तंत्रज्ञान अवगत केल्याने हा प्रकार रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़. यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होत असून विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांना या जुगाराच्या खेळातून गंडवले गेल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. यांची तातडीने दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मुंबईत विधानभवन येथे गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, सायबर क्राईम तसेच सबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत फास्ट ट्रॅक बैठक बोलावली होती.
यावेळी नरहरी झीरवाळ यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना , नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना या प्रकरणातील सुत्रधारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी येत्या आठवड्यात ऑनलाईन रोलैट जुगाराचा मुख्य सूत्रधार पकडला जाणार असल्याची माहिती दिली आणि येत्या ४ महिन्यात या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावण्यात येईल अशी ग्वाही देत सर्व आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि मोक्का अंतर्गत शिक्षा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी ऑनलाईन रोलैट रॅकेटचा नाशिकमधील सुपर डीलर कैलाश शाह याला पुन्हा एकदा पकडण्याची सर्व पुराव्यानिशी तयारी झाली असल्याची माहिती या बैठकीत दिली. या ऑनलाईन रोलैट जुगारामुळे तरुणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असून फसवणूक झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली आणि भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाचा कडक अंकुश असण्याची गरज व्यक्त केली आणि गरज पडल्यास कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याविषयी विचार करता येईल.राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर भोईर आणि नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी या संदर्भात पाठपुरावा करून बैठक लावण्याची विनंती केली होती.