दिंडोरी – तालुक्यातील जवळके वणी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ने जिल्हा बँकेने मंजूर केलेल्या कर्जमर्यादेचे उल्लंघन न करता सर्व पात्रधारक सभासदांना कर्जवाटप केले असून बँकेस नियमित कर्ज परतफेड करत पारदर्शक कारभार सुरू असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन भास्करराव पाटील यांनी दिली. दिंडोरी तालुक्यातील जवळके वणी सोसायटीत नियमबाह्य कर्ज वाटप केल्याच्या कथित आरोप होत असल्याने सोसायटीचे चेअरमन भास्करराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
जवळके वणी सोसायटीने जिल्हा बँकेने मंजूर केलेल्या कर्ज मंजुरी पत्रकानुसार १९ कोटींची मंजुरी मिळाली असतानाही १६ कोटीचेच कर्जवाटप केले आहे. कुठलेही कर्ज वाटप मंजुरीचे उल्लंघन केलेले नाही. सोसायटीचे साधारण कर्ज मागणी केलेल्या प्रत्येक पात्र सभासदास कर्ज वाटप केलेले आहे. कुणीही पात्र सभासदास कर्जापासून वंचित ठेवले नाही. गेले काही वर्षांपासून दीर्घ मुदत, मध्यम मुदत, पाईपलाईन, लिफ्ट योजना आदी कर्ज वाटप बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण होत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना द्राक्ष बागा वाचविण्यासाठी पाईपलाईन लिफ्ट करण्याची आवश्यकता असताना लिफ्ट पाईपलाईन कर्ज वाटप बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांची कर्जफेडीची पात्रता बघून वाढीव कर्जपुरवठा केलेला आहे. मात्र सर्व कर्जाची नियमित परतफेड सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती द्राक्ष शेतीचे नुकसान झाले असल्याने शेतकरी पूर्ण कर्जफेड करू शकले नाही, त्यामुळे काही प्रकरणांमध्ये व्याज भरून नवे जुने करून घेत शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. जिल्हा बँकेने कर्जवाटप करण्यास सोसायटीस आतापर्यंत सहकार्य केले आहे. जिल्ह्यातील अनेक सहकारी सोसायट्या बंद पडत असताना जवळके वणी सोसायटी सातत्याने नियमित कर्जपुरवठा करत आहे. सोसायटीस लेखापरिक्षणात ‘अ ‘ वर्ग मिळत असून शेतकरी हिताचे कामकाज सुरू आहे असे चेअरमन भास्करराव पाटील यांनी सांगितले.