दिंडोरी – तालुक्याचे पश्चिम भागात गेले दहा दिवसांपासून संततधार सुरू असून दिंडोरी तालुक्याचे पश्चिम भागात ननाशी परिसरात तसेच पेठ व सुरगाणा तालुक्यात अनेक गावपाडे हे डोंगर दऱ्यात वसलेले असून त्यात काही पाडे हे धोकेदायक ठिकाणी आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ननाशी येथील आरोग्य केंद्रात ,ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून फोन येत जवळच असलेल्या ननाशी बारे रस्त्यावरील घाटातील रडतोंडी पाड्याजवळील दरड कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. तातडीने वैद्यकीय पथक ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली तर काही वेळातच नाशिक – दिंडोरी – पेठ येथून विविध विभागाच्या वाहनांचा ताफा रडतोंडीकडे रवाना झाला.
दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर,तहसीलदार पंकज पवार आदींसह वन विभाग ,बांधकाम विभाग ,पोलीस ,आरोग्य विभाग,वीज वितरण आदी सर्व विभागाचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनचे जवान घटनास्थळी हजर झाले. जेसीबी आदी आवश्यक साहित्य तातडीने बोलावले. प्रशासनासोबत आजूबाजूच्या गावचे ग्रामस्थही मदतीला धावले. दरम्यानच्या काळात रडतोंडी येथे दरड कोसळत सुमारे १० ते १५ घरे ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. या गावातील नागरिकांना लोक काळजीपोटी फोन करत खुशाली विचारू लागले. अधिकारी व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना नागरिक फोन करू लागले.
अखेर ही आपत्ती काळातील उपाययोजनाची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) असल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला .मुसळधार पावसामुळे सध्या ठिकठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून त्यात रायगड जिल्ह्यातील तळीये या गावी झालेली दुर्घटना या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरात अशी दुर्घटना घडली. तर तातडीने मदत कार्य करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी जिल्हा प्रशासनाने ही रंगीत तालमीचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल ) असल्याचे समजले. त्यानंतर मात्र सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान स्थानिक रहिवाशी ही सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अचानक गावात आलेला ताफा पाहून काही काळ गोंधळून गेले होते. शासकीय यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन हे रंगीत तालीम घेत असल्याचे निदर्शनास आले व तालुक्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला.