दिंडोरी- तालुक्यातील ननाशी परिसरासह पेठ तालुक्यातील काही गावांना मंगळवारी सकाळी पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून सुदैवाने यात कुठलीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. मेरी येथील भूकंप मापन केंद्रात या भूकंपाची ३ रिष्टर स्केल इतकी नोंद करण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ४० किमी अंतरावर दाखविण्यात आला आहे .पेठ तालुक्यातील माळेगाव, असतंनपाडा ,आसरबारी ,कोटंबी ,खोकरतळे ,भायगव ,गोंदे ,उस्थळे ,जांभूळमाळ ,कोहोर ,आड ,तसेच दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि परिसरात काही गावांमध्ये सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी अचानक मोठा आवाज होऊन जमीन ,घरावरील पत्रे हादरल्याचे .तर काही ठिकाणी घरातील भांडे खाली पडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने या परिसरात भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवत आहेत .दरम्यान यावर्षी आजपर्यंत तीनवेळा सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे या परिसरात भूकंप मापन यंत्र बसवावे तसेच भविष्यातील संकट टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरात जोर धरत आहे .