दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊसाच्या बिलापोटी रक्कम रु.१०० /- प्र.मे.टन रुपयेप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केले आहे. ऐन गरजेच्या वेळी ऊसाचा हप्ता व कारखान्यातर्फे रासायनिक खते उधारीने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २०२०-२१ या हंगामात केंद्र शासनाने रिलीज कोट्याप्रमाणे साखर विक्री सुरु आहे. मात्र यंदा साखरेस भाव नसून साखरेस उठाव नाही. परिणामी साखर विक्री कमी होत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणतेही उपपदार्थ निर्मीती नसतांना ही उत्तर महाराष्ट्रातील इतर कारखान्यापेक्षा कादवाची एफ.आर.पी रु.२६९७.३२ सर्वाधिक आहे.
अनेक कारखाने मागील वर्षाची एफ.आर.पी पूर्ण देऊ शकले नसतांना कादवाने मागील वर्षाची एफ.आर.पी पूर्ण अदा करत या वर्षाची यापूर्वी रु.२४२५ व आता पुन्हा रुपये १०० याप्रमाणे २५२५ रुपये ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केले आहे. उर्वरीत एफ.आर.पी ची रक्कम लवकरात लवकर अदा करणेचे व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी कारखान्याचे प्रयत्न सुरु असून सिडफार्म मध्ये विविध जातीचे व्ही.एस.आय ने प्रमाणित केलेले ऊस रोपे बनविण्यात येत आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उधारीने रासायनिक खतांचे वाटप करणेत येत आहे . कादवाचे इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून सभासद शेतकऱ्यांना सदर प्रकल्पासाठी ठेवी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ठेवीवरती १० टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. त्यास अनेक सभासद व संस्थानी प्रतिसाद देत ठेवी देणेस सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे, व्हा.चेअरमन उत्तमबाबा भालेराव व संचालक मंडळाने केले आहे .