मोहाडीत राज्यस्तरीय कृषी कार्यशाळा उत्साहात
दिंडोरी –‘ प्रगतशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगं ठरणार नाही’, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहीम २०२१ ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमाल निर्यात करणार्या शेतकर्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा मोहाडी येथील कर्मवीर एकनाथ जाधव यांच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी कृषीमंत्री दादा भुसे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, माजी आमदार धनराज महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, जि.प.कृषी विभाग सभापती संजय बनकर, सुरेश डोखळे, माजी जि.प.सदस्य प्रवीण जाधव, आयुक्त धीरजकुमार, संजय पडोळ, दशरथ तांभाळे, रविंद्र शिंदे, विवेक सोनवणे, सुनील वानखेडे, राजेंद्र निकम आदी मान्यवर उपस्थित होते. दादा भुसे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने कृषीविषयक घेतलेल्या तीन विधेयकात सुधारणा होणे आवश्यक आहे.
शेतकर्यांचे एखाद्या व्यापार्यांकडे अडकलेले पैसे तत्काळ काढून शेतकर्यांना देण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. आपण त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे भुसे यांनी सांगितले. शेतकर्यांना येणार्या प्रत्येक अडचणींवर विचार करून न्याय देण्याचे काम केले जाईल असे आश्वासित करण्यात आले. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करून नका असे आवाहनही केले. ज्या वानाला भाव त्या पिकाला महत्व द्यावे, निर्यातीसाठीीकाम करणार्या सर्व विभागाला एकाच छताखाली आणून एकदिवसीय ऑनलाईन मार्गदर्शन सत्र केला जाईल, शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आवश्यक उपाययोजना व मदत करण्यासाठी कृषी विभाग व महाराष्ट्र शासन कटिबद्ध असेल. 30% योजना महिलांसाठी राखीव केल्याने महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने काम केल्याबाबत स्पष्ट करत जास्तीत जास्त शेतकर्यांना फायदा होईल व तो कर्जमुक्त होईल असे काम कृषी विभागाकडून करत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
कार्यशाळेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन वक्तत्यांचे मार्गदर्शन व शेतकर्यांचे मनोगत आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी डॉ. केदार थेपडे (जळगाव), प्रशांत वाघमारे (अपेडा), किरण डोके (सोलापूर), स्वप्निल पाटील (देवळा), विशाल अग्रवाल (जळगाव) यांनी आपल्या मनोगतातून येणार्या अडचणी व आपल्या यशस्वी वाटचालीची अनुभव सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वंदना जाधव (निफाड) अनंत पाटील (जळगाव) यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक किसन मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विभागीय अधिक्षक सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, तालुक्यातील सर्व क्षत्रिय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.