दिंडोरी : तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना एक द्राक्ष निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रक्कमेस फसविले असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान सदर व्यापाऱ्यांनी अजून अनेक द्राक्ष उत्पादकांची आर्थिक फसवणूक केली असून दिंडोरी ,निफाड व चांदवड तालुक्यातून सुमारे दोन ते तीन कोटींची फसवणूक झाल्याची चर्चा असून फसवले गेलेले शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार, पोलीस अधीक्षक यांची भेट घेत निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर ४७ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
दिंडोरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातून परदेशात द्राक्ष निर्यातीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांना फसविण्याच्या घटना कायम होत असतात. दिंडोरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्री सोल्युशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. यातील अमित देशमुख फरार असून इतरांना पोलिसांनी अटक केली आहे
सुनील शिंदे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करत त्यांच्या शेतातील ११२८६ किलो माल खरेदी करून त्याचे पाच लाख २६ हजार १७१ रुपये व्यवहार व्यापाऱ्याने ठरविला. परंतु, व्यवहाराचे रोख पैसे न देता धनादेश देत शिंदे यांची बोळवण करण्यात आली. धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याने दुसरा धनादेश दिला. तोही न वटल्याने फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. दुसऱ्या घटनेत निगडोळ येथील अनिल मालसाने यांच्या शेतातील आठ हजार ७०१ द्राक्ष खरेदी करत व्यवहारात ४ लाख ८ हजार ५०५ रुपये देणे ठरले. हे पैसे मालसाने यांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीवर संपर्क साधत मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, उडवाउडवीची उत्तरे मिळत गेली.
तिसऱ्या घटनेत नळवाडी येथील संजय वाघ यांच्या शेतातील नऊ हजार २६७ किलो द्राक्ष संशयिताने खरेदी करुन व्यवहार पाच लाख ९८ हजार, ८५५ रुपयांमध्ये ठरवला. द्राक्ष खरेदी करतांना संशयितांनी वाघ यांना चार लाख रुपये आरटीजीएसने दिले. उर्वरीत एक लाख ९८ हजार ८५५ रुपये मिळविण्यासाठी वाघ यांनी संशयितांशी प्रत्यक्ष संर्पक साधला. परंतु, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चौथ्या घटनेत शरद मालसाने यांनी संशयितांना सहा हजार ६८६ किलो द्राक्षे विकली. खरेदी करतांना संशयितांनी मालसाने यांना २५ हजार रुपये दिले. मात्र व्यवहारातील उर्वरीत तीन लाख, ७६ हजार ९० रुपये मागितले असता धनादेश दिला. तो वटला नाही. पाचव्या घटनेत वलखेड येथील रघुनाथ पाटील यांच्या शेतातील सहा हजार ५०३ किलो द्राक्ष माल संशयितांनी खरेदी के ला. यासाठी व्यवहारात दोन लाख, ८२ हजार ३६५ रुपये देणे ठरले. मात्र संशयितांनी पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी अद्याप हे पैसे परत केले नाही. दरम्यान इतर अनेक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून आज अजून दहा शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण करत आहे.