दिंडोरी : हायब्रीड एन्यूटी प्रोग्रॅम अंतर्गत होत असलेल्या नाशिक कळवण रस्त्यावर दिंडोरी परिसरात पाऊस पडताच वाहनांच्या घसरगुंडीची मालिका सुरूच आहे. येथे बांधकाम विभागाच्या गुणवत्ता विभागाने पाहणी करत उपाययोजना करणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभाग सपशेल दुर्लक्ष करत उलट रस्ता खूप चांगला होत गुळगुळीत झाल्याचे वाहनधारक जोरात गाड्या चालवतात. असे गुळमुळीत उत्तर देत ठेकेदारांची पाठराखण करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गुरुवारी नऊ तर शुक्रवारी चार गाड्या घसरून अपघात झाले या अपघातानंतर कुठे तरी बांधकाम विभागास जाग आल्याने सायंकाळी स्पीडब्रेकर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अक्राळे फाटा ते लखमापूर फाटा परिसरात काही ठिकाणी वारंवार अपघात होत असताना बांधकाम विभाग मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे. .सदर रस्त्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र सदर रस्त्याला कुठेही सफेद पट्टे रिफ्लेकटर दिशादर्शक फलक नाही .दिंडोरी शहरातील काँक्रीटीकरण अद्याप करण्यात आलेले नाही सदर कामात अनेक त्रुटी व दिरंगाई होत असताना बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असून या विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने संबंधित ठेकेदार मनमानी प्रमाणे काम करत आहे. ज्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहे. त्याठिकाणी अपघातांची कारणे शोधत उपाययोजना करणे आवश्यक असताना दररोज अपघात होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
गुरुवारी नऊ गाड्यांचे अपघात झाल्यानंतर खासदार डॉ भारती ताई पवार,विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले सदर अधिकारी यांनी शुक्रवारी पाहणी करत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते काही दिंडोरीकडे फिरकले नाही. दुपारी पुन्हा पावसाच्या आगमनासोबत रणतळ येथे दोन कंटेंनर व मारुती व्हॅनचा तिहेरी अपघात झाल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या खासदार डॉ पवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेत तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले. तर आमदार झिरवाळ यांनीही कार्यकारी अभियंता यांना तातडीने उपाययोजना करा व शनिवारी सदर ठिकाणी स्वतः भेट देणार असल्याचे सांगितले. अखेर बांधकाम विभागास जाग येत सायंकाळी स्पीडब्रेकर टाकण्याचे काम सुरू केले आहे.