दिंडोरी : हायब्रीड अॅन्यूइटी मधून होत असलेल्या नाशिक कळवण रस्त्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने पाऊस होताच या रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी सुरू असून वाहनांच्या नुकसानी सोबत काही नागरिकांना जीव गमवावा लागत असून अनेक जण जखमी होत आहे. रणतळ परिसरात आज तब्बल सहा वाहने घसरून अपघात होत वाहनांचे नुकसान होत प्रवासी जखमी झाले आहे.
नाशिक कळवण रस्त्याचे नूतनीकरण होत असून सदर काम तीन वर्षे उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.सदर काम सुरू असताना अनेक अपघात झाले होते .तर आता ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अक्राळे फाटा ते दिंडोरी व सिडफार्म ते अवनखेड परिसरात पाऊस होताच रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी होत आहे. त्यात रणतळे येथील उतार तर अपघात प्रवण क्षेत्र बनले असून पाऊस होताच येथे गाड्या घसरत आहे. या रस्त्यावरील अपघातात काही वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.मागील महिनाभरात दोन ट्रक घसरून त्याखाली दोन चालक दबले गेले होते. त्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले होते.सदर रस्त्याचे नूतनीकरण झाल्यापासून अनेक अपघात होत अनेकजण जखमी झाले आहे. सदर रस्त्याचे कामाचा योग्य दर्जा न राखल्याने सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने त्वरित पाहणी करत योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी जयवंत जाधव,नितीन देशमुख,रणजित देशमुख,किरण जाधव आदींनी केली आहे.