दिंडोरी : कोव्हिडच्या लढ्यात दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व इतर वैद्यकीय साहित्य तसेच कोव्हिडं सेंटरला भरीव मदत दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. दिंडोरी येथील प्रार्थमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत कोव्हिडं साठी सुमारे नऊ लाख चाळीस हजाराचा निधी जमा केला होता. सदर निधीतून त्यांनी पाच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन आवश्यक वैद्यकीय उपकरणे साहित्ये व दिंडोरी येथील कोव्हीड सेंटर साठी आर्थिक मदत विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पंचायत समितीत आरोग्य विभागास सुपूर्द करण्यात आली त्यावेळी झिरवाळ बोलत होते.
पुढे बोलताना नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील शिक्षक हे ज्ञानार्जन बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहे अनेक ठिकाणी शिक्षकांनी डिजिटल शाळा,वाचनालय यात योगदान दिले असून ऑनलाईन शिक्षणासाठी गरजू विदयार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले रक्तदान शिबीर घेतले व आता अत्यावश्यक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वैद्यकीय साहित्य देण्यासोबतच दिंडोरीतील कोव्हिडं सेंटरला जी अत्यावश्यक गरज भासली त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देत सामाजिक जबाबदारी पार पाडली असल्याबद्दल सर्व शिक्षकांचे तसेच कोव्हिडं लढ्यात योगदान देणाऱ्या इतर सर्व सरकारी कर्मचारी सामाजिक संघटना व नागरिकांचे आभार मानले.
दिंडोरी नगरपंचायत प्रशासन व कर्मचारी यांनी दिंडोरीत कोव्हीड सेंटर खूप चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.सर्वांचे सहकार्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी तज्ज्ञांनी अजून तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले असल्याने ती येऊच नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावीच. पण आरोग्य यंत्रणा सक्षम केली जात असून वणी व दिंडोरीत ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. तर बोपेगाव व ननाशी येथील ऑक्सिजन बेड सुविधेचे कोव्हिडं सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सदर सेंटर हे तात्पुरते करण्यावजी इतर आजारांवरील उपचारासाठी त्याचा वापर व्हावा यासाठी ते कायमस्वरूपी करण्याचे दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.यावेळी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, जिप सदस्य भास्कर भगरे,गटशिक्षणाधिकारी कनोज यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक समन्वय समितीतर्फे सचिन वडजे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी तर आभार प्रल्हाद पवार यांनी मानले. यावेळी तहसीलदार पंकज पवार,सभापती कामिनीताई चारोस्कर, माजी जिप उपाध्यक्ष प्रकाश वडजे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ विलास पाटील,मुख्याधिकारी नागेश येवले,विस्तार अधिकारी के पी सोनार, केंद्र प्रमुख राजेंद्र गांगुर्डे,डॉ योगेश गोसावी,मनोज शर्मा,शाम हिरे,गंगाधर निखाडे,छबु मटाले आदींसह सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संघटना पदाधिकारी सचिन वडजे, रावसाहेब जाधव, धनंजय वानले, अनिल गायकवाड,जयदीप गायकवाड, राजेंद्र परदेशी, योगेश बच्छाव , दिगंबर बादाड, रवींद्र ह्याळीज, प्रवीण वराडे, नितीन देवरे, मनोहर देसले, मधुकर आहेर, भर्तरीनाथ सातपुते, संजय निकुंभ, निंबा दात्रे, विलास पेलमहाले, सुभाष बर्डे, निवृत्ती चारोस्कर आदींनी परिश्रम घेतले.
शिक्षकांनी लसीकरण मोहिमेत जनजागृती करावी
आदिवासी भागात लसीकरणाबाबत अनेक समज गैरसमज असून भीती आहे .शिक्षक हा खूप जबाबदार घटक असून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो तरी त्यांनी समाजातील हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावे .व्हिडीओ च्या माध्यमातून प्रत्यक्ष संपर्कातून लसीकरणाचे महत्व पटवून देत त्यांची भीती दूर करावी लसीकरण मोहिमेत शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले त्यास शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावोगावी जनतेचे प्रबोधन करत लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आश्वासित केले. झिरवाळ यांनी शिक्षकांसोबत च पूर्व भागातील अनेक बागायतदार यांचेकडे आदिवासी मजूर कामाला येतात त्यांनाही आवाहन करत आपण मजुरांशी संपर्क करत त्यांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करावे असे सांगितले तर आदिवासी समाजातील सर्व कर्मचारी वर्गाने आपल्या गावी असणाऱ्या बांधवांचे गैरसमज भीती दूर करत लसीकरण करून घेण्यास सांगावे असे आवाहन केले.