दिंडोरी : दिंडोरी शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असून त्याप्रमाणात दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ७० ते १०० लस येत असल्याने दिंडोरी शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल का? शहराला दररोज च्या ५०० तरी लस मिळाली पाहिजे अशी मागणी युवानेते रणजित देशमुख यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना त्यावर कोविड 19 वर प्रतिबंधात्मक म्हणून लस दिली जात आहे. आणि त्या लसीचा चांगला फायदा होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर लसीकरण झाल्यास जनतेला त्याचा फायदा होणार आहे.
याबाबत केंद्राकडून राज्याला येणारा लसीकरणाचा साठा हा जिल्यातुन तालुक्याला वाटप केला जात आहे.दिंडोरी तालुक्यात एकूण १० प्राथमिक आरोग्य केंद्र व दिंडोरी ग्रामीण रुग्णालय व वणी ग्रामीण रुग्णालय यांना समप्रमाणात लस ची वाटप होते. परंतु दिंडोरी शहर हे तालुक्याचे ठिकाण असून नगरपंचायत आहे.शहराची लोकसंख्या २५ हजार च्या आसपास असतांना केवळ शहरात असलेले ग्रामीण रुग्णालय येथे केवळ ७० ते १०० लस मिळत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात व नगरपंचायत चा विचार करून शहरातील नागरिकांसाठी दररोज कमीत कमी ५०० लस उपलब्ध झाल्या पाहिजेत.
ग्रामीण भागाचा विचार करता दिंडोरी शहर हे तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असल्याने या केंद्राआंतर्गत दिंडोरी शहरात दोन उपकेंद्र आहेत. त्यामुळे तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्यतिरिक्त दिंडोरी येथील दोन उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय दिंडोरी अशा तीन ठिकाणी लसीकरण सुरू ठेवून जास्त प्रमाणात लस उपलब्ध केल्यास शहरातील जनतेला वेळेत लस मिळेल.
यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग यांनी एकत्रित नियोजन करून जास्त प्रमाणात लस मिळवून लसीकरण करावे व नामदार नरहरी झिरवाळ यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी रणजित देशमुख यांनी केली आहे.